शिऊर येथे दिड लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

जामखेड शहर : पुढारी वृत्तसेवा

जामखेड तालुक्यातील शिऊर येथे मध्यरात्रीच्या सुमारास निकम वस्ती या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी फीर्यादी अंकुश रामभाऊ निकम (वय ७५) यांच्या घरात प्रवेश करून १ लाख ५६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फीर्यादी अंकुश रामभाऊ निकम व त्यांचा मुलगा शुक्रवारी रात्री आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या घराला बाहेरुन कडी लावलेली होती तर घरामध्ये त्यांची पत्नी व सुन झोपलेले होते. शनिवारी मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडुन घरात प्रवेश करून कपाटातील १ लाख ५६ हजारांचे दागिने लंपास केले. पहाटे शेतातुन मोटार बंद करण्यासाठी घरी फोन लावला असता घरात चोरी झाली असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी फीर्यादी अंकुश रामभाऊ निकम (वय ७५) रा. शिऊर, ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. विद्या बांगर या करत आहेत.

चौकट

जामखेड तालुक्यात मागिल महीन्यात २५ मार्च रोजी वाघा येथे घरफोडी करुन ३ लाख ९६ हजारांची घरफोडी झाली होती. या महिन्यात दि १२ एप्रिल रोजी बावी येथे अज्ञात चोरट्यांनी ७२ हजारांचा ऐवज लंपास केला होता. आघी येथे दि १९ एप्रिल रोजी रात्री महीलेच्या गळ्यातील धुमस्टाईल चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातच आता पुन्हा शिऊर या ठिकाणी दिड लाखांची चोरी झाली यावरुन ग्रामिण भागात चोरीच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. पोलीसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांन मधुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here