

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती – सभापती प्रा. राम शिंदे
डिजिटल शिक्षण साहित्याचे लोकार्पण उत्साहात
जामखेड प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणातील तफावत कमी करण्यासाठी डिजिटल शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साध्य होणार आहे असे मत सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
कर्जत-जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डिजिटल शैक्षणिक साहित्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, तहसीलदार धनंजय बांगर, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, गटविकास अधिकारी शुभम जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख राम निकम, केंद्रप्रमुख भास्कर नरसाळे, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, नगरसेविका संगीता भालेराव, नगरसेविका नंदा होळकर, अमित चिंतामणी, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, प्रविण होळकर, डॉ.विठ्ठल राळेभात ,अनिकेत जाधव आदी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन साधनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन शिक्षण अधिक रंजक व सुलभ होईल. शिक्षकांनी या साधनांचा प्रभावी वापर करून अध्यापन पद्धतीत बदल घडवून आणावा व विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द, चिकाटी व सतत ज्ञान संपादनाची वृत्ती जोपासावी. या आधुनिक सुविधांचा उपयोग करून ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर यश मिळवू शकतील, असा विश्वास प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शाळेस डिजिटल शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रत्येक शाळेला ६५ इंची संवादात्मक फलक, ई-शिक्षण प्रणाली, बिनतारी की-बोर्ड व सूचक उपकरण तसेच अखंड वीजपुरवठा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळणार असून शिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी व संवादात्मक होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, उपाध्यक्ष बाळू जाधव, मुख्याध्यापक मच्छिंद्र खैरे, उपाध्यापक प्रताप पवार, संजय आरेकर, जयश्री पाटील, मंगल सोलंकर, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे, स्वाती गोरे आदींनी परिश्रम घेतले.
1) चौकट
प्रा. राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये किमतीच्या डिजिटल शैक्षणिक साहित्याचे आतापर्यंत एकूण ३४३ जिल्हा परिषद शाळांना वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील २२५, जामखेड तालुक्यातील ११४ तसेच अहिल्यानगरमधील ४ शाळांचा समावेश आहे.

2) चौकट
प्रत्येक शाळेला ६५ इंची संवादात्मक फलक, ई-शिक्षण प्रणाली, बिनतारी की-बोर्ड व सूचक उपकरण तसेच अखंड वीजपुरवठा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील एकूण २६६ शाळांपैकी सन २०२२-२३ मध्ये ४१, सन २०२४-२५ मध्ये १०० आणि सन २०२५-२६ मध्ये ८४ अशा एकूण २२५ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील एकूण १७३ शाळांपैकी सन २०२२-२३ मध्ये ३०, सन २०२४-२५ मध्ये २८ आणि सन २०२५-२६ मध्ये ५६ अशा एकूण ११४ शाळांमध्ये डिजिटल साहित्य वितरित करण्यात आले आहे.




