

महिलांनी आपले हक्क व कायदे जाणून घ्यावेत-न्यायाधीश अनुश्री फंड
ल. ना. होशिंग विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी
स्त्री सशक्त झाली तर कुटुंब सशक्त झाले तर समाज सशक्त झाला तर राष्ट्र सशक्त होते असे प्रतिपादन जामखेड न्यायालयाच्या न्यायाधीश अनुश्री फंड यांनी केले. दि १० मार्च २०२६ रोजी शहरातील दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटी चे ल. ना. होशिंग विद्यालयात तालुका विधी सेवा समिती जामखेड व वकील संघ जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्या जयश्री देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश अनुश्री फंड या उपस्थित होत्या.यावेळी आर.एस.पी. कॅडेट मुलींनी सामना सॅल्यूट करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ माँ साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना गौरविण्यात आले.

पुढे बोलताना न्यायाधीश अनुश्री फंड म्हणाल्या की, भारतीय संविधानाने महिलांसाठी विशेष तरतुदी केल्या असून त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. महिलांनी आपले अधिकार आणि कायदे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्याची माहिती झाल्यास स्वतःचे हक्क आणि समोरच्या व्यक्तीची जबाबदारी याची जाणीव होते व आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुखकारक जगता येते. आजची स्त्री ठरवले तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले, तर सावित्रीबाई फुलेंमुळे महिलांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला. त्यामुळे संसार असो किंवा राजकारण, प्रत्येक क्षेत्रात महिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकते.

अध्यक्षीय भाषणात जयश्री देशमुख म्हणाल्या, “पुढच्या जन्मातही मला स्त्रीच व्हायचे आहे. कारण स्त्रीकडे नवजीवन निर्माण करण्याची अद्भुत शक्ती आणि वेदना सहन करूनही जगाला जन्म देण्याचे सामर्थ्य आहे. स्त्री ही फक्त एक नाव नाही, ती एक ओळख आहे. ती जगाचा भार नाही, तर जगाची सुरुवात आहे. त्यामुळे स्त्री असणे हा प्रश्न नसून अभिमान आहे.”

यावेळी आरोग्य विभागाच्या सुप्रिया कांबळे, अंजली चिंतामणी, मंगल तंठक, नगर परिषदेच्या नगरसेविका वैशाली म्हेत्रे, सिमा कुलकर्णी, नगरसेविका नंदा होळकर, संगीता भालेराव, प्रिती राळेभात, प्रा.हिना सय्यद, नंदा गोरे, राजश्री मोरे आदी महिला भगिनी तसेच प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य प्रा. युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक अनिल देडे, बबन राठोड, मुकुंद राऊत, पोपट जगदाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नरेंद्र डहाळे, पांडुरंग वराट, राजेंद्र कोहक, किशोर कुलकर्णी, कार्यालयीन अधिक्षक ईश्वर कोळी, उमाकांत कुलकर्णी, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, रोहित घोडेस्वार, आदित्य देशमुख यांच्या सह वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके, ॲड.उपाध्यक्ष घनश्याम राळेभात, सचिव ॲड शिवाजी लटपटे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. पोपट कात्रजकर, ॲड. महारुद्र नागरगोजे, कोर्ट कर्मचारी सागर ढगे, राजेश जाधव आदी शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका खके जयश्री, डूचे वंदना, होमकर सुरेखा, पोकळे प्रमिला, भोईटे योगिता, पानसरे ऐश्वर्या, रणसिंग प्रिया, बाबर वैष्णवी, कात्रजकर अनुपमा तसेच माध्यमिक शिक्षिका संगीता दराडे, वंदना अल्हाट, पूजा भालेराव, स्वाती बांगर, स्वप्नाली घाडगे, रेश्मा कारंडे, प्रभा रासकर, स्वाती गिरी, प्रियांका सुपेकर, शितल जगदाळे, मोहिनी उगले आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती साबळे व सुत्रसंचालन अनिल देडे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुप्रिया घायतडक यांनी मानले.


