आ. रोहित पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी

जामखेड प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांमधून घातपाताची शक्यता उपस्थित करून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या सुरक्षेसाठी ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खर्डा पोलीस स्टेशन येथे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या कडे निवेदन सादर केले. निवेदनात रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांमागील सत्य बाहेर येणे आवश्यक असून, यामुळे प्रभावशाली शक्तींना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद केले आहे. अजित पवारांसारख्या लोकनेत्याचा घातपात करणाऱ्या मोठ्या शक्तींकडून आमदार रोहित पवारांना देखील धोका निर्माण होऊ शकण्याची भिती यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पाठवले असून, पोलिस प्रशासनाने ते वरिष्ठ पातळीवर कळविण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत शासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून, “सत्य मांडणाऱ्या नेतृत्वाचे रक्षण ही सरकारची जबाबदारी आहे,” असे ठणकावून सांगितले. या मागणीमुळे जामखेड तालुक्यात आणि राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी श्रीकांत लोखंडे, वैभव जमकावळे, मदन पाटील, चंद्रकांत गोलेकर, गोवर्धन गायकवाड, गणेश जगताप, बिभीषण परकड, चंद्रकांत गोलेकर, रामहरी गोपाळघरे, गणेश ढगे, प्रकाश गोलेकर, रविराज गायकवाड, मोहन भोसले, बाळासाहेब सुळ, राजेंद्र जाधवर, हनुमंत बारगजे, शाम सकट, दत्तात्रय भोसले, राम शिंदे, प्रल्हाद गिते, मुकुंद गोलेकर, अशोक खटावकर, दिपक जावळे, रामहरी जायभाय, सुहास पाटील, बाळासाहेब गोलेकर, संदिप शिकारे, संदिप बिरंगळ, दत्तराज पवार, हरीदास गोलेकर, गोकुळ गोलेकर, मोहन सुरवसे, संतोष लष्करे, सिताराम जावळे, बब्बू शेख, हनुमंत गोलेकर, धनंजय गोलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

कार्यकर्त्यांचे सुरक्षा कवच व ढाल बनण्याचा इशारा

तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी सांगितले, की झेड प्लस सुरक्षा न मिळाल्यास राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते रोहित पवार यांचे २४ तास ढाल व कवच बनतील. साधारण १५ निर्भिड व तरुण कार्यकर्त्यांची टिम सलग दोन दिवसाची सुरक्षेची जबाबदारी घेईल आणि या सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून इच्छुक कार्यकर्त्यांकडून विचारणा होत असून याबाबतची परवानगी आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना द्यावी अशी मागणी केली असल्याची माहिती विजयसिंह गोलेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here