

प्रभाग सात मध्ये महिलांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी.
जामखेड प्रतिनिधी
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी होळकर निवासस्थान, स्वराज नगर, तपनेश्वर गल्ली, जामखेड या ठिकाणी शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सदर कार्यकाम प्रभाग सातच्या नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर व महिला भगिनी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी, योगिताताई पोपट राळेभात, महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई संजय काशिद यांची उपस्थिती लाभली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रजल्वन मान्यवर अतिथी व ज्येष्ठ महिला भगिनी यांच्या हस्ते करून सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित महिला भगिनी यांनी शिवपाळणा यांचे सादरीकरण करत शिव जन्मोत्सवाचे स्वागत केले. भक्ती व शक्ती तसेच अध्यात्म व स्वराज्य या संगमाचे प्रतीक असणारा ऐतिहासिक प्रसंग अर्थातच जगदगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा जिवंत देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला. तसेच ऐतिहासिक शिवगीतावर विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती उपस्थित महिला भगिनी यांच्या हस्ते करण्यात आली. पुष्पृष्टी करत महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शिवगर्जनेच्या माध्यमातून राजांचा जयजयकार केला. शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलू या विषयक माहिती पल्लवीताई सागर बाबर यांनी आपल्या प्रभावी मनोगत मधून सादर केली.महिलांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या सर्वांगसुंदर शिवजयंती कार्यक्रमास शुभेच्छा, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, रोहिणीताई काशिद, योगिताताई राळेभात यांनी आपल्या मनोगत मधून दिल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर तर सूत्रसंचालन योगिताताई सचिन देशमुख यांनी केले.

आकर्षक सजावट केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती, फुलांची आरस केलेला शिवपाळणा, महाआरती, शिवर्जना, पुष्पवृष्टी व आतिषबाजी, मनमोहक रांगोळी, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज ऐतिहासिक भेट जिवंत देखावा, विद्यार्थी नृत्य व महिला मनोगत या बाबींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव महिला समिती तसेच स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व तथा भाजपा शहर मंडल उपाध्यक्ष प्रविण होळकर व प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






