

जवळा गावातील शेतकऱ्यांसाठी सभापती प्रा. राम शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या मागणीला यश
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जवळा येथील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित वीज समस्येला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिणी योजना टप्पा- २ अंतर्गत जवळा येथील ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत विधानपरिषद सभापती मा. प्रा. राम शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी शिफारस केली आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात, “जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे शेतकऱ्यांना अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिणी योजना टप्पा- २ अंतर्गत १० एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत आपल्या स्तरावरून तातडीचे आदेश द्यावेत.” अशी विनंती केली आहे.
उपकेंद्र ओव्हरलोड; शेतीपंपांना कमी दाबाची वीज
जवळा येथील ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रांतर्गत सध्या केवळ १ एमव्हीए क्षमतेचे दोन पावर ट्रान्सफार्मर कार्यरत आहेत. वाढती लोकसंख्या, शेतीपंपांची संख्या, नवीन वीज जोडण्या तसेच गावठाण व ग्रामीण भागातील वाढलेली वीज मागणी यामुळे हे उपकेंद्र सध्या पूर्ण क्षमतेपेक्षा अधिक भाराखाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी पुरेशा दाबाची वीज मिळत नसून, अनेक वेळा रात्री अपरात्री सिंचन करावे लागत आहे. कमी व्होल्टेजमुळे मोटारी जळणे, फ्यूज उडणे, वारंवार वीज खंडित होणे असे प्रकार वाढले असून, याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

सात फिडरचा भार एका उपकेंद्रावर
या वीज उपकेंद्रांतर्गत जवळा गावठाण, नान्नज व आगी असे तीन गावठाण फिडर असून, शेतीपंपांसाठी जवळा, नान्नज, हाळगाव व धोंडपारगाव असे एकूण सात फिडर आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसराचा भार एकाच उपकेंद्रावर येत असून, विद्यमान ट्रान्सफार्मर अपुरे पडत आहेत.
युवा नेते प्रशांत (भाऊ ) शिंदे व जवळा ग्रामपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
या गंभीर समस्येबाबत जवळा ग्रामपंचायतचे उपसरपंच व भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत (भाऊ) शिंदे व जवळा ग्रामपंचायतीने विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच ८ फेब्रुवारी रोजी शिंदे यांनी सभापती यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. यावेळी भाजप युवा नेते व उपसरपंच प्रशांत (भाऊ) शिंदे यांच्यासमवेत सरपंच सुशील आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, राहुल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संतराम सुळ सह आदी उपस्थित होते.
प्रशांत (भाऊ) शिंदे व सरपंच सुशील आव्हाड यांनी हा मुद्दा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याचे सांगत, सदर ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम महावितरणमार्फत प्रस्तावित असून, सदरचे काम तातडीने होणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली होती. आता या मागणीला यश येताना दिसत आहे.

दरम्यान, जवळा व परिसरातील वीज प्रश्नांबाबत प्रशांत (भाऊ) शिंदे व जवळा ग्रामपंचायतीने यापूर्वीही महावितरणकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. कमी दाबाची वीज, वारंवार खंडित होणारा पुरवठा, जळालेल्या ट्रान्सफार्मरची तात्काळ दुरुस्ती, पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे खंडित होणारा वीजपुरवठा, शेतीपंप जोडण्या तसेच नवीन फिडर मंजुरी आदी मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी निवेदने दिली होती. याशिवाय करमाळा–जामखेड रस्त्यावर १३ जून २०२४ रोजी रस्ता रोको आंदोलनही त्यांनी केले होते.
युवा नेते प्रशांत (भाऊ) शिंदे व जवळा ग्रामपंचायतीने केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी १० फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून “जवळा, (ता. जामखेड) येथे शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिणी योजना टप्पा २ अंतर्गत १० एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत आपल्या स्तरावरून तातडीचे आदेश द्यावेत.” अशी विनंती केली आहे. जवळा येथे १० एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्यात आल्यास हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
१० एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्यात आल्यास जवळा व परिसरातील शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत नियमित व पूर्ण दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होणार असून, शेती उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री स्तरावरून सकारात्मक निर्णय होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

चौकट
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिणी योजना टप्पा-२ अंतर्गत १० एमव्हीए क्षमतेचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्याबाबत मा. सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली शिफारस ही अत्यंत महत्त्वाची व सकारात्मक पाऊल आहे. याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
जवळा व परिसरातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून कमी दाबाची वीजपुरवठ्यामुळे सिंचनास अडचणी येत होत्या, ज्यामुळे शेतीत नुकसान होत असे. या ट्रान्सफार्मरमुळे शेतकऱ्यांना नियमित व पूर्ण दाबाने वीज मिळेल आणि शेती उत्पादनात वाढ होण्यास मोठा हातभार लागेल. भविष्यात यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्थैर्य वाढेल, सिंचन व्यवस्था सुधारेल आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, अशी आम्ही अपेक्षा करतो.
सुशील आव्हाड – सरपंच ग्रामपंचायत, जवळा







