

प्राचार्य डॉ. के. एच शिंदे यांची रयतच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड.
जामखेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्था साताऱ्याच्या जनरल बॉडी सदस्य पदी प्राचार्य डॉ. कुंडलिकराव शिंदे यांची निवड करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या ता. १८ जानेवारी २०२६ रोजी भरलेल्या बैठकीतील ठराव नं. २३ अन्वये संस्था घटना कलम 6 (h) नुसार सेवानिवृत्त आजीव सभासद प्रवर्गातून जनरल बॉडीच्या सभासद पदी निवड झाली आहे. याबाबत संस्थेने पत्रव्यवहाराद्वारे त्यांना कळवले.

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” या विचाराला कृतीत उतरणार्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे यांची नुकतीच निवड झाली आहे. गेल्या तब्बल ४२ वर्षांपासून बहुजन समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी निष्ठेने कार्य करणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा हा सन्मान मानला जात आहे.
शिक्षक, प्राचार्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळताना डॉ. शिंदे यांनी शिक्षण, प्रशासन आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. एनसीसी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम आणि नेतृत्वगुण रुजवले. हे मूल्यबोधन पुढे त्यांच्या प्रशासकीय कामकाजातही दिसून आले. प्राचार्य म्हणून कार्यरत असताना एस.एम.जोशी महाविद्यालय, हडपसर, एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव, आर. बी. एन. बी. महाविद्यालय, श्रीरामपूर, जिजामाता महाविद्यालय श्रीगोंदा आदी महाविद्यालयांमध्ये त्यांनी भौतिक सुविधा बळकट करण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी भरीव योगदान दिले. नॅक (NAAC) मूल्यमापनात या महाविद्यालयांना चांगला दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

हडपसर (पुणे) येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये डॉ. शिंदे यांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. नवीन इमारतींचे नियोजनबद्ध बांधकाम, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वसतिगृहाची उभारणी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास ही त्यांच्या दूरदृष्टीची प्रतीके ठरली. या कार्याची दखल घेऊन माजी केंद्रीय मंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
संशोधन क्षेत्रातही डॉ. शिंदे यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन करून त्यांनी अर्थशास्त्र विषयात स्वतंत्र ओळख निर्माण केली. आजवर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी. व एम.फिल.चे मार्गदर्शन केले असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर कार्यरत राहून अभ्यासक्रम रचना व मूल्यमापन प्रक्रियेतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार मिळाले. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन २०२० मध्ये त्यांना ‘आदर्श प्राचार्य’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवरील त्यांची निवड ही संस्थेसाठी अनुभवी, दूरदृष्टी असलेल्या शिक्षणतज्ज्ञाची भर मानली जात असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी निश्चितच होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.





