एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यावर प्रवाशांची लूटमार, अस्वच्छता आढळल्यास होणार कारवाई…. नवी आचारसंहिता लागू

मुंबई : अनेकदा आपण एसटी बसने प्रवास करतो. प्रवासादरम्यान एसटी ठरलेल्या हॉटेल थांब्यावर थांबते. या हॉटेल थांब्यावर अनेकदा आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. कधी तिथे अन्नपदार्थांचा दर्जा आपल्याला आवडत नाही. तेथील शौचालयांमध्ये स्वच्छता नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तसेच अव्वाच्या सव्वा दरात अन्नपदार्थ विकले जातात. यामुळे सर्वसामान्यांना परवडत नाही. पण हे सर्व नियमांच्या बाहेर आहे. त्यामुळे आता तसे प्रकार आढळल्यास एसटी प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे आता एसटी प्रशासनाने एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू केली आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. तेथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्यांबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे.

नव्या आचारसंहितांचे नवे नियम काय-काय?

1) यापुढे नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देत असताना ती ३ वर्षासाठी दिली जाईल. पण १ वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधांचा फेर आढावा घेऊन पुढील 2 वर्षीच्या मुदत वाढीबाबत विचार केला जाणार आहे.

2) या हॉटेल थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थाचा दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्याने विचार केला जावा, असे देखील निविदा प्रक्रियेत नमूद केले जाणार आहे.

3) या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वस्तुस्थितीजन्य अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या हॉटेल थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाई करण्यात येणारा आहे.

4) संबंधित हॉटेल तामिळी महामंडळाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर एफ. आय.आर. देखील दाखल केला जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी या हॉटेल थांब्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत.

5) एकंदर प्रवाशांना योग्य प्रकारे सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या हॉटेल थांब्याची निवड करावी, तसेच त्यातून एसटी महामंडळाचा महसूलदेखील वाढवा अशा दुहेरी उद्देशाने नवे हॉटेल-मोटेल धोरण एसटी महामंडळाने जारी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here