रोखठोक जामखेड …..
नगर जिल्ह्यातील पहिला म्युकरमायकोसीसचा रुग्ण जामखेड तालुक्यातील पिंपरखेडचा रामभाऊ महादेव ढवळे (वय-48) कोरोनाशी झुंज देऊन बाहेर पडतो न पडतोच त्याला म्युकरमायकोसीस ने गाठले. त्याच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे दोन्ही डोळे सुजले आहेत. एका डोळ्याची नजर कमी आली आहे. त्याच्या उपचारार्थ त्याची पत्नी औषधाची शोधाशोध करते आहे. तिचा एकाच वेळी आजारा बरोबरच परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे.
रामभाऊ हा एकुलता एक; आई-वडील वयोवृद्ध. पत्नी आणि एक मुलगा,मुलगी असा परिवार. रामभाऊ एका खाजगी कारखान्यात काम करायचे मात्र तो कारखाना काही दिवसापासून बंद आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा जगण्यासाठी चा संघर्ष सुरुच होता.त्यात कोरोना महामारीत कोरोनाच्या संसर्गाने रामभाऊला गाठले आणि कुटुंबा समोर नवीन अवहान उभे राहिले. रामभाऊला कोरोनाच्या उपचारासाठी जामखेड, श्रीगोंदा येथे उपचारार्थ फिरावे लागले. रेमडेसिव्हिर ची गरज पडली असता खासदार डॉ. सुजय विखे, आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे या तिघांकडूनही प्रत्येकी दोन इंजेक्शन मिळाले. मदतीच्या ओझ्याखाली दबलेले हे ढवळे कुटुंब यातून सावरेल अस वाटत असतानाच रामभाऊला म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव झाला; उपचारासाठी पत्नीने नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले.यासंदर्भात रामभाऊच्या नववी इयत्ते शिकणाऱ्या मुलीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना भेटून हकीगत सांगितली.
आर्थिकदृष्ट्या आडचणीत असलेला पिंपरखेड येथील रामभाऊ ढवळे हा तरुण ‘ म्युकरमायकोसीस ‘ आजाराशी संघर्ष करतोय; त्याला गरज आहे समाजातील दातृत्व संपन्न व्यक्तीच्या मदतीची …! औषधा बरोबरच गरज आहे आर्थिक मदतीची … !
चौकट:
रामभाऊ हे घरातील कर्ते व्यक्ती असून त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्यांना उपचारासाठी मदतीची गरज आहे. तरी समाजातील दातृत्व संपन्न व्यक्तीनी आर्थिक मदतीसाठी “जामखेड तहसीलदार” यांच्याशी संपर्क साधावे,असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.






