जामखेड शहरात गुटखा पकडला, ६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

जामखेड प्रतिनिधी

जामखेड पोलिसांनी शहरातील मोरे वस्तीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला आसलेल्या प्रोफेसर कॉलनी येथे अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या गुटख्याच्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ६ लाख ३४ हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १५ मे २०२६ रोजी रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. असुन या प्रकरणी एक जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी बाळु उर्फ शिवदत्ता नंदकुमार मोहिते (रा. बोरटे वस्ती, जामखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महेंद्रा जितो कंपनीचे मालवाहू बंद बॉडी वाहन (क्र. एम.एच. १२ एन. एक्स. २१८३) ताब्यात घेतले. पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळु शांतिलाल खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला पानमसाला व तंबाखूजन्य गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. जामखेड शहरात दि १५ मे २०२६ रोजी मोरे वस्तीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला आसलेल्या प्रोफेसर कॉलनी भागात एका मालवाहू टॅम्पो मध्ये अवैद्य गुटखा आसल्याचे पोलिसांना माहित झाले. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सदरचा गुटख्याचा टॅम्पो पकडला. कारवाईत डायरेक्टर स्पेशल पान मसाला, विमल पान मसाला, सुपर साऊंड पान मसाला, सम्राट पान मसाला गुटखा तसेच विविध प्रकारचे सुगंधी तंबाखूचे पाकिटे असा एकूण २ लाख ५९ हजार १४६ रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला. तसेच मालवाहू टेम्पोची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. असा एकुण पोलीसांनी ६ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी वरील आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पो. कॉ. बाळु खाडे, पो. कॉ. वैजिनाथ मिसाळ, पो. कॉ. धनराज बिराजदार यांच्या पथकाने केली आहे.

चौकट –

जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत, तेही पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात खर्डा पोलिसांनी येऊन कारवाई केल्यामुळे जामखेड पोलिसांना हा प्रकार माहिती नव्हता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात खुलेआम गुटखा विक्री व साठेबाजी सुरू असताना स्थानिक पोलिसांकडून प्रभावी कारवाई का होत नाही याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here